मुंबई : महाराष्ट्र विधान सभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची यांची निवड झाली. गदारोळात हे मतदान पार पडले. भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार नार्वेकर यांना 164 मत मिळाले.
नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून मांडला. महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला. यात नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तीन आमदारांनी तटस्थतेची भुमिका घेतली. नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच झाली.
नार्वेकर यांच्या निवडीवर सर्वप्रथम काँग्रेसने आक्षेप घेतला. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. काँग्रसने आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात काॅंग्रेसने तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती.
नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील
राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून विधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडला आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विधान सभेच्या विशेष आधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.या
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा आहे. ज्यांनी ज्यांनी या अध्यक्ष पदावर कार्य केले आहे. त्यांना देशपातळीवर नावाजले गेले आहे म्हणून विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळे महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली आहे. ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचाविण्याचे कार्य करतील. सरकार पारदर्शक पणे कार्य करेल सभागृहात सदस्यांवर अन्याय होऊ नये, वेळप्रसंगी समज देऊन योग्य मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ॲड. राहुल नार्वेकर हे राज्यातील आणि देशातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कार प्राप्त ॲड. नार्वेकर हे कायद्यात निष्णात असल्याने या पदावरून न्यायदानाचे काम करतील. यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उत्तम काम केले आहे, हिच परंपरा ॲड. नार्वेकर यांच्या कालावधीत पुढे सुरू राहिल. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. नार्वेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ॲड. नार्वेकर यांना शुभेच्छा देऊन सभागृहात राज्याच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार सुनिल प्रभू, अबू आझमी, बच्चू कडू, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, हरिभाऊ बागडे, किशोर जोरगेवार, धनंजय मुंडे आदी सदस्यांनीही ॲड. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.