Kanhana : नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीविरुद्ध प्रचार करण्यासाठी काँग्रेस जवळ कोणतेही नवे मुद्दे नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास संविधान बदलले जाईल असा अपप्रचार केला जात आहे. संविधान बदलण्यासाठी काय लागते हे सर्वांनाच ठाऊक आहे. संविधान बदलणे म्हणजे ‘बच्चो का खेल’ नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेनेचे राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपुरातील कन्हान येथे आयोजित जाहीर सभेत मोदी बोलत होते. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, काँग्रेसने तब्बल 80 वेळा संविधान बदलले. काँग्रेसने संविधान तुडवत आणीबाणी लागू केली. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळू दिला नाही. परंतु आमचे सरकार येताच मुस्लिम, दलित, आदिवासी समाजाला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत नेले. त्यामुळे काँग्रेसला संविधान बदलाबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.
एक हजार वर्षाचा विचार करा
2024 मध्ये मतदान करताना भारताची निर्मिती आणि राष्ट्रीयत्व लक्षात घेऊन एक हजार वर्षांचा विचार करा. त्यानंतरच बटन दाबा. देशात ज्या ज्या वेळी मोदींना शिव्या हासडण्यात आल्या, त्या त्या वेळी देशातली जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. दहा वर्षांपूर्वी देश कोणत्या अवस्थेत होता व आज कोणत्या क्रमांकावर जगात आहे याचा विचार सर्वांनी करावा. त्यानंतरच मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन मोदी यांनी केले.
पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली
रामटेक आणि अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, यंदाच्या रामनवमीला अयोध्येत श्रीराम आपल्या हक्काच्या मंदिरातून दर्शन देणार आहेत. विदर्भातील रामटेकची भूमी श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पुनीत झाली आहे. त्या रामटेकच्या भूमीने मतदान करताना सखोल विचार करावा.
संविधान लागूच होऊ दिले नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान देशात लागू होऊ दिले नाही. देशासाठी स्वतंत्र संविधान होते तर जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान काँग्रेसने ठेवले होते. परंतु जम्मू-काश्मीरातून कलम 370 हटवण्याचे धाडस केवळ नरेंद्र मोदीच करू शकतो, असे पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केले. कलम 370 हटल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक दलितांना आरक्षण प्राप्त झाली आहे. दलितांना आरक्षण हे बाबासाहेबांनी संविधानात नमूद केले होते. परंतु काँग्रेसने संविधानाची पायमल्ली केली. त्यामुळेच जम्मू काश्मीरातील दलित वंचित राहिला होता, असे मोदी म्हणाले.