Bhandara News : लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहिता काळात तपासणी चेकपोस्टवर आपले कर्तव्य करीत असताना दोन कर्मचाऱ्यांना मद्यप्राशन करणे चांगलेच भारी पडले आहे. आचारसंहितेच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याने भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पवनीचे विस्तार अधिकारी व भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अश्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पवनी येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल. जे. कुंभरे आणि भंडारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक सचिन पढाळ असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तपासणी नाका (चेकपोस्ट) तयार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्हातील पवनी तालुक्यात निलज येथेही तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. पवनी येथे निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निवडणूक निरीक्षक सर्च अधिकारी हे निलज चेकपोस्टला निरीक्षणासाठी गेले. त्यावेळी संबंधित कर्मचारी मद्यप्राशन करून पोलिस तंबूमध्ये (टेन्ट) झोपलेले असल्याचे आढळले. नियुक्त निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याने लगेचच दोनही कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी केली व दोषी आढळले. निवडणूक कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे शासकीय कर्मचऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या कर्तव्यात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.