Prahar Janshakti Party : भाजपने विरोध झुगारत अमरावती येथे नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने संतापलेल्या बच्चू कडू यांनी आता अकोला मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अकोल्यात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना प्रहारने पाठिंबा जाहीर केला. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. रामटेक मतदारसंघातही प्रहारकडून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू हे दीड वर्ष अकोल्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अकोल्यात प्रहार वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडूंचा चाहता वर्ग आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रहारच्या उमेदवारांना मिळालेले मतदान लक्षात घेतले तर लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू हे भाजपचे अकोल्यातील राजकीय गणित बिघडवू शकतील अशी शक्यता आहे.
अकोल्यात अनुप धोत्रे यांच्यापुढे वेगवेगळी आव्हाने उभी होत आहेत. अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. भाजपचेच नेते माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत कोणत्याही क्षण तह होईल असे प्रयत्न करण्यात येत आहेत. असे झाल्यास अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र वेगळे राहु शकते. अशातच आता बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने अनुप धोत्रे यांच्यापुढील आव्हान वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात अकोल्यातील चित्र काय राहते याची उत्सुक्ता सर्वांना आहे.
सोमवारी (ता. 07) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी सोमवती अमावस्या आहे. अशात राजकीय पटलावर कोणाच्या नशिबात काळोख पसरतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. प्रचाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी फ्रंटफुटवर आहे. अशात प्रहारनेही महाविकास आघाडीला आधार दिल्याने अकोल्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.