MPDA Law News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार किंवा जेलमध्ये स्थानबद्ध करण्याची मोहिम अकोला पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार अकराव्या गुन्हेगाराला अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी हे आदेश दिलेत.
अकोला शहरातील अकोट फैल भागातील शंकर नगरात राहणाऱ्या कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे (वय 30) याला जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. शंकरविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी दुखापत, पुरावा नष्ट करणे, खोटी माहिती देणे, दंगल, शांतता भंग करणे, धमकाविणे. हद्दपारीच्या आदेशांचे उल्लंघन करणे, ॲट्रॉसिटी असे बरेच गंभीर गुन्हे आहेत. प्रतिबंधक कारवाई करून शंकर ऐकत नसल्याने त्याला जेलबंद करण्याचा प्रस्ताव पोलिस विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार कुंभार (IAS Ajit Kumbhar) यांनी शंकरला एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश दिला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शंकरला पोलिसांनी जेलबंद केले आहे. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहराचे पोलिस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे, कर्मचारी ज्ञानेश्वर सैरीसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, अकोट फैल पोलिस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर कडू, उपनिरीक्षक देविदास फुलउंबरकर यांनी यासाठी कार्यवाही केली.