Congress On Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा हा जातीयवादी शक्तींच्या विरोधात आहे. दोन्हीही पक्ष एकाच गोष्टीसाठी लढत आहे. संविधान वाचविण्यासाठी. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे निश्चित महाविकास आघाडीत येतील असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी नागपूर येथे व्यक्त केला. ‘नवस्वराज’शी बोलताना आमदार पटोले म्हणाले की यंदा देशातील जनतेला परिवर्तन हवे आहे आणि हे परिवर्तन होणार आहे.
महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा अद्यापही थांबलेली नाही. कोणी काहीही अफवा पसरवित असले तरी सर्वांचीच इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष हा संविधान रक्षणासाठी व जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी व्हावा. आघाडीत चर्चेच्या फेऱ्या अद्यापही सुरू आहे. जोपर्यंत या चर्चेतून काही ठोस निष्पन्न होत नाही, तोपर्यंत कोणाला किती जागा देणार यावर बोलणार नाही. मात्र एवढे नक्की सांगू शकतो की प्रकाश आंबेडकर हे संविधान रक्षणाच्या लढ्यात आमच्या सोबत राहतील.
काँग्रेसकडून याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीत स्वागतच आहे. यासंदर्भात पवार आणि ठाकरे हे बोलणी करणार आहे. येत्या 24 तासात वंचित बहुजन आघाडीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत निर्णय झालेला दिसेल असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार पटोले यांनी स्पष्ट केले.
नागपुरात विजयाची गॅरंटी
यंदा लोकसभा निवडणूक राजकीय नसून विचारांची लढाई आहे. नागपूर नेहमीच काँग्रेसच्या विचाराचे शहर राहिलेले आहे. विचारांच्या लढाईत नागपुरात काँग्रेसचा, महाविकास आघाडीचा विजय होईल. भाजपचे लोक विकासाचे खोटे दावे करीत आहेत. त्यांना प्रश्न आहे की, त्यांचा स्वतःचा किती विकास झाला आणि देशाचा विकास किती झाला हे त्यांनी जाहीर करावे. केवळ सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढविण्याचे काम केले गेले. त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये, नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल असा त्यांना सल्ला आहे, असे पटोले म्हणाले.
नागपूरची जनता सुजाण आहे. नागपूरचा उमेदवार हे स्वतःला बलाढ्य समजून पंतप्रधान पदाचा उमेदवार आपण असल्याचे 2014 मध्ये सांगत होते. 2019 मध्येही त्यांनी तेच सांगितले. पण देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला संपविण्याची पावले नरेंद्र मोदी यांनी उचलली. त्या सगळ्याला ज्यांनी पाठिंबा दिला, त्या पापाचे वाटेकरी हे नागपुरात आहेत. नागपुरात भाजपविरोधी वातावरण आहे. भाजपला कशासाठी मतदान करायचे? त्यांना महागाईवर नियंत्रण मिळविले नाही. शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.भाजपच्या या अन्यायाविरोधात महाविकास आघाडी लढाई लढत आहे, असे नाना पटोले म्हणाले.