Crime News : लोकसभा निवडणुकीपूर्वी अकोला पोलिसांनी धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू केले आहे. विविध ठिकाणी छापे घालत पोलिसांनी अवैध दारू, गांजा जप्त केला आहे. याशिवाय चार सराईत गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह (IPS Bacchan Sing) यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अकोला शहरातील अवैध धंद्यांवर छापे घालण्यात आलेत. एकूण आठ आरोपींना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. विनापरवानगी देशी दारूची विक्री, गाठवडी हातभट्टी चालविणे, मद्याची वाहतूक असे आरोप ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध आहेत. एकूण पाच ठिकाणी छापे घालण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी 3 लाख 45 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल अशा कारवाईतून जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गोपाल जाधव, राजेश जवरे व त्यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
माना परिसरातून गांजा जप्त
माना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी गस्त घालताना 141 किलो गांजा जप्त केला आहे. माना फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. अमरावतीकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या दहा टायरच्या ट्रकमध्ये (क्रमांक WB12-D7237) हा गांजा भरून ठेवण्यात आला होता. गस्त घालताना पोलिसांना ट्रकजवळ संशयास्पद हालचाल दिसल्याने त्यांनी पिंटु कृष्णा दास (रा. कोलकाता) यांची चौकशी केली. त्यावेळी ट्रकमध्ये गांजाची पोती आढळली. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे पोलिस उपअधीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज सुरोशे, उपनिरीक्षक गणेश महाजन, कर्मवारी उमेश हरमकर, पंकज वाघमारे, नंदकिशोर हिरूळकर, जयकुमार मंडावरे यांनी ही कारवाई केली.
चार गुन्हेगार हद्दपार
लोकसभा निवडणूक व उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राहावी यासाठी अकोला पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातून चार सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुणाल प्रदीप देशमुख (वय 23), रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोला रामचंद्र तिवार (वय 27) यांना अकोल्याच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपार केले आहे. अकोट शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अब्दुल सुलतान अब्दुल इरफान (वय 22), अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून संतोष दिनकर काळे याला अकोटच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM-SDO) हद्दपार केले आहे. आतापर्यंत अकोल्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 27 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
गोवंशाची सुटका
कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गोवंशाची पोलिसांनी पहाटेच्या सुमारास पाठलाग करून मुक्तता केली. रात्रीची गस्त घालत असताना रामदास पोलिसांना कत्तलीसाठी गोवंश नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, विजय सावदेकर, तोहीद अली काझी, अनिल धनभर, रोशन पटले यांनी मोमिनपुरा चौकात नाकाबंदी केली. पोलिसांनी चौकात महेंद्र झायलो कंपनीच्या वाहनाला (क्रमांक MH02-CR0160) अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहनासह पळ काढला. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करीत आरोपींना कागजीपुरा येथे पकडले. पोलिस पोहोचेपर्यंत चालक आणि वाहक पळून गेले होते. पोलिसांनी तपासणीनंतर आठ गोवंश जनावरांची सुटका केली.