Mumbai : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही 5 टप्प्यांमध्ये होणार असल्याची घोषणा केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 2 टप्प्यात होणारी ही निवडणूक 5 टप्प्यांमध्ये का घेण्यात येत आहे ? याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्या आचारसंहितेच्या काळात कुठेही दंगा अथवा वाद झालेला नाही. कुठलीही अडचण नसताना तसेच वातावरण अनुकूल असताना महाराष्ट्रात निवडणूक 5 टप्प्यांमध्ये का घेतली जात आहे ? हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
महाराष्ट्रात बर्फ पडत नाही, पाऊस पडत नाही किंवा दळणवळणासाठी घोडे, हत्ती यावरून मतदान केंद्रांवर जाण्याची समस्या नाही. मग असा निर्णय का घेण्यात आला, हे अनाकलनीय असल्याचे आंबेडकर बोलले.
मविआ चर्चेवर प्रतिक्रीया देण्यास नकार
महाविकास आघाडी आणि वंचितच्या जागा वाटपाच्या चर्चेसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थॅंक्यू म्हणत विषय टाळला. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न जास्त गंभीर झाला असल्याचे दिसून येते.
गांधींच्या कार्यक्रमात जाण्याचा अद्याप निर्णय नाही
राहुल गांधी यांच्या मुंबई येथील सभेला तुम्ही जाणार का ? असा प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, कॉंग्रेसकडून निमंत्रण मिळाले असले तरी देखील त्यावर आमची कमिटी निर्णय घेईल. त्यानंतर सभेला जाण्याबद्दल ठरवण्यात येईल.
5 टप्प्यात मतदान कोणासाठी सोईस्कर – जयंत पाटील
देशभरात 7 टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात केवळ 48 मतदारसंघ आहेत, त्यासाठी 2 टप्प्यात मतदान होऊ शकते, परंतू 5 टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले आहे ? याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे. अशी मागणी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे पाठोपाठ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केली आहे.