Beed: पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत मोठे वक्तव्य केल्याने राजकारणात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. पाच वर्षांचा वनवास खूप झाला. आता वनवास नको, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य अतिशय सूचक मानले जात आहे.
अमित शाह सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाड्यातील स्थितीचा आढावा शाह घेतला. त्यानंतर त्यांनी निवडून येण्याची क्षमता याच एकमेव निकषावर उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले. अमित शाह यांनी मुंडेंच्या नेतृत्वाला कौल दिल्याचे चित्र असून पंकजा मुंडेंची बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे या मैदानात उतरतील असे दिसत आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार देण्यात येण्याची शक्यता आहे. हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही आहे. त्याठिकाणी तानाजी मुरकुटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच भाजपमध्ये सामील झालेले अशोक चव्हाण यांच्या भाचीला नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांची भाची मीनल खतगावकर नांदेड लोकसभा लढवताना दिसू शकतील. मीनल खतगावकर यांनी अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची भेटही घेतली होती.
पंकजा यांचे शब्द जसेच्या तसे!
‘एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटले की पाच वर्षांचा असावा या कलयुगात बाबा! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा. आम्हाला 5 वर्षेच खूप झाला. का अजून पाहिजे तु्म्हाला? मग तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मला माहित नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहिले आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीले होते, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त मला फार काही मिळालेले नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते, ते केवळ तुमच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे’ असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.