Yavatmal : राज्यातील महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 9 मार्चला यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांची मते जाणून घेतली. मुंबई सोडून राज्यातील या 19 ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीपासूनच आपला दावा केलेला आहे. असे असताना आता काँग्रेस देखील येथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईत पार पडलेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसकडून जीवन पाटील, माणिकराव ठाकरे, चक्रधर गोटे यांच्यासह काही नेत्यांची नावे निवडणुकीसाठी समोर येत आहेत.
कोणाच्या नावाची चाचपणी
काँग्रेसने काही नावाची चाचपणी केली आहे. गडचिरोली: नामदेव उसेंडी, नामदेव किरसान, भंडारा-गोंदियासाठी सर्व अधिकार नाना पाटोले यांना देण्यात आले आहेत. यवतमाळ-वाशीमसाठी शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, जीवन पाटील ही नावे चर्चेत आहेत. चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, शिवानी वडेट्टीवारांची नावे शर्यतीत आहेत. हिंगोलीतून प्रज्ञा सातव, नांदेडमधून वसंत चव्हाण, आशा शिंदे, विदर्भातील रामटेकमधून रश्मी बर्वे, कुणाल राऊत, राजू पारवे, किशोर गजभिये यांचे नाव चर्चेत आहे. नागपूर मतदारसंघातून आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुडधे, अमरावतीतून आमदार बळवंत वानखेडे, किशोर बासेकर, अकोलामधून डॉ. अभय पाटील, अशोक अमानकर, लातुरातून उमेदवार निवडीचे सर्व अधिकार अमित देशमुख यांना देण्यात आले आहेत. जालनामधून कल्याण काळे, विलास अवथडे, संजय लाखे पाटील शर्यतीत आहेत. नांदुरबारमधून माजी मंत्री के.सी. पाडवी, शिरीष नाईक किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यावर विचार सुरू आहे. धुळे येथुन कुणाल पाटील, श्याम सनेर, तुषार शेवाळे, कोल्हापुरातून शाहू महाराज, सांगलीतून विशाल पाटील, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुणे येथुन रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे, भिवंडीतून दयानंद चोरघे, सुरेश तावरे यांच्या नावावर विचार सुरू आहे.
मागे वळून पाहताना
2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी 5 लाख 40 हजार 104 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. आता ही जागा उद्धव ठाकरे गटाला हवी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. गवळी आणि ठाकरे यांच्या विजयाचे अंतर 1 लाख 17 हजार 607 मतांचे होते. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत गवळी यांना 4 लाख 76 हजार 930 मते होती. काँग्रेसचे शिवजीराव मोघे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 93 हजार 291 मतांचे होते. त्यामुळे यवतमाळ मतदार संघावर ठाकरे गटापेक्षा काँग्रेसचा दावा प्रबळ मानला जात आहे.