Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी अकोला पोलिसांनी कुख्यात गुंडांना स्थानबद्ध करण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. सहा) साहेब खान अहमद खान (वय 28) याला एमपीडीए कायद्याअन्वये एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी हे आदेश दिलेत.
अकोला शहरातील बैदपुरा येथे राहणारा कुख्यात गुंड साहेब खान अहमद खान याच्याविरुद्ध जबरी चोरी, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे, मालमत्ता फोडून चोऱ्या करणे, घरातील चोरी, शांतता भंग करणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नव्हता. प्रतिबंधक कारवाई करूनही तो गुन्हे करीत होता.
खाना गुन्हेगारी आलेख बघता त्याच्याविरूद्ध गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी कुंभार यांना सादर केला होता.जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून कुख्यात गुंड साहेब खान याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिला. खान याला बुधवारी अकोला जिल्हा कारागृहात कोठडी बंद करण्यात आले. सदरचे आदेश तामील करण्यात आले.