Akola : मनुताई कन्या शाळेतील सरस्वती शिशु वाटिकेत मंगळवार 5 मार्च रोजी पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख वक्ता म्हणून विद्या भारतीचे महाराष्ट्र, गोवा वाटिका प्रमुख भाई उपाले, नाशिक विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, विदर्भ प्रांत सहमंत्री समीर थोडगे, महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे, चार्टर्ड अकाऊंटंट अनिरुद्ध चौधरी उपस्थित होते. भाई उपाले यांनी आपल्या भाषणात शिशू मंदिराच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या बाबींचे अभ्यासपूर्ण अवलोकन केले. मुलांच्या विकासासाठी तो कसा उपयुक्त आणि आवश्यक आहे, हे उपाले यांनी अत्यंत प्रभावीपणे उदाहरणांसह समजाऊन सांगितले. प्रत्यक्ष अनुभवानेच विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते, त्यांचा सर्वांगीण विकास होतो, तसेच आत्मविश्वास बळावतो असेही भाई उपाले म्हणाले.
पालकांपैकी स्वप्नील देशपांडे, प्रीती राजपूत आणि रसिका देशपांडे यांनी त्यांच्या पाल्यांनी शिशु वाटिकेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या पाल्यांचा आत्मविश्वास वर्षभरात वाढून व्यक्तिमत्व विकास झाल्याचे सांगितले. शिशू वाटिकेतील शिकवण्याच्या पद्धतीचं कौतुक करून त्यांनी शिक्षिकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आकांक्षा देशमुख यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्या भारती अकोला महानगरद्वारा आयोजित पालक मार्गदर्शन शिबिरामध्ये पालकांसह सरस्वती शिशु वाटिका प्रमुख दीप्ती गदाधर, मृदुला चौधरी, भारती मराठे, अंजली अग्निहोत्री, स्वाती गंगाखेडकर, सुवर्णा वानखेडे, नितीन भोळे, भूषण बापट आदी उपस्थित होते.