Nagpur : शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार तसेच लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचा स्वच्छ कारभार आणि पारदर्शक असल्याचा दावा करण्यात येत असला तरी कंत्राटदारांकडून लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणातील अधिकारी करीत नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे याला 20 लाखांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) अटक केली असून, झडतीत काळे याच्या घरातून एकूण 45 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
एका खासगी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामाचे कंत्राट दिले होते. खासगी कंपनीने काम वेळेवर पूर्ण करून, बिलही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले. बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. त्यांनी लवकरच बील मंजूर करून पैसे खात्यात टाकण्याचे आश्वासनही दिले. परंतू दोन महीन्याचा कालावधी लोटल्यावरही बिल मंजूर न झाल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने काळे यांची पुन्हा भेट घेतली आणि बिल मंजूर करण्याबाबत विनंती केली. त्यावेळी काळे यांनी बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील 11 अन्य अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल, अन्यथा बील मंजूर करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. बिलाची रक्कम काढण्यासाठी अरविंद काळे यांनी कंत्राटदार कंपनीकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. कंपनीने लाच देण्यास नकार दिल्यामुळे काळे यांनी बिल रोखून धरले. नाईलाजास्तव कंत्राटदार कंपनीने सीबीआयकडे लेखी तक्रार केली.
सीबीआयने तक्रारीची शहानिशा केल्यावर 3 मार्च रविवारी दुपारी सापळा रचला. कंत्राटदाराने 20 लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शविल्यावर, सरव्यवस्थापक अरविंद काळे यांनी लाचेची रक्कम 20 लाख रुपये स्वीकारताच सीबीआयने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम 11 अधिकाऱ्यांपर्यंत पोहचणार असल्यामुळे सीबीआयने अन्य 11 अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने अटक केलेल्या अरवींद काळे यांच्या घराची झडती घेतली असता 25 लाख रुपयांची रक्कम आढळली. सीबीआयने एकूण 45 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.