भूषण इंदाैरिया | Bhushan Indoriya
Akola : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मनपा उपायुक्त गीता वंजारी आणि गीता ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
सहाय्यक संचालक नगर रचना आर. एस. महाजन, मनपा नगर रचनाकार आशिष वानखडे, सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे यांचेसह अकोला महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून अकोला महानगरपालिका पश्चिम क्षेत्रअंतर्गत छत्रपती शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 19 फेब्रुवारी रोजी मनपा शिक्षण विभाग आणि पश्चिम झोन कार्यालय यांच्याव्दारे मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त गीता वंजारी आणि उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात शिवाजी महराजांचे जीवन आणि त्यांच्या विशिष्ट कामगिरीबाबत माहिती दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सात, मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक चार, मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 22 तसेच मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 16 मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या विविध पराक्रमाच्या गाथा आदिंबाबतचे नृत्य, गायन पोवाड्यांच्या सहाय्याने सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्याकडून उत्कृष्ट व भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या चिमुकलल्यांना रोख बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमात मनपा उपायुक्त गीता वंजारी, सहाय्यक संचालक नगर रचना आर. एस. महाजन, नगर रचनाकार आशिष वानखडे, मनपा प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, सहा.आयुक्त विजय पारतवार, मनपा आयुक्त यांचे स्वीय सहायक जितेंद्र तिवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याद्यापक राजीव भिरड यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका अनिता नवलकर आणि नयना गोटे यांनी केले. आभार प्रदर्शन गजेंद्र ढवळे यांनी केले.