अकोला : वन विभागाने कोणतीही परवानगी दिली नसताना बोरगाव मंजू पळसो मार्गावरील सुमारे ३०० झाडे रहस्यमयरित्या कापण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर वन विभागाला खडबडून जाग आला आहे. मात्र तोपर्यंत ३०० वृक्षांचा बळी गेला आहे.
वृक्ष कापण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोल्याचे आरएफओ व्ही. आर. थोरात यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांना १५ ते २० मोठी झाडे कापण्यात आल्याचे आढळल्याचे थोरात यांनी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. वन विभागाने याप्रकरणी शेतकरी व नागरिकांचे बयाण नोंदविले आहे. कापण्यात आलेल्या झाडांची मोजणी वन विभागाने सुरू केली आहे. अशा पद्धतीने वृक्ष कापण्याची परवानगी कुणालाही देण्यात आली नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. जून १ ते ऑक्टोबर ३० या काळात वृक्ष कटाईची परवागीच देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोरगाव मंजू, अन्वी, मिर्झापूर, दहेगाव, पळसो मार्गावर २०० पेक्षा जास्त झाडांची बेकायदा कत्तल करण्यात आल्याचे आढळले आहे. बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अनेक झाडेही कापण्यात आली आहेत. रात्रभरातून ही झाडे कापण्यात आली व सकाळी ती वाहतूक करून नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना हा प्रकार वन विभागाच्या लक्षात कसा आला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.