अकोला : आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभागाने तयारी केली आहे. यात्रा काळात भाविक प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातून यंदा २०० बसचे नियोजन आहे. महाराष्ट्र सरकारने यंदा एसटीच्या प्रवासात महिलांना सवलत दिली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत कायम आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने एसटी महामंडळाने तयारी सुरू केली आहे.
यावर्षी २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. उत्सवासाठी पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक जातात. अनेक भाविक पायी जातात. मात्र पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसह वाहनांद्वारे जाणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. पायी चालत जाऊन दर्शन घेतल्यानंतर परतीचा प्रवास वाहनांद्वारे करण्यात येतो. त्यामुळे एसटी गाड्यांची मागणी वाढते. अकोला विभागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून वारीसाठी नियोजन करण्यात आले आहे. २९ जून रोजी एकादशी आहे. यामुळे १५ जूनपासून पंढरपूरकडे गाड्या सोडण्यात येणार आहे. वारीनंतर ५ जुलैपर्यंत बस सोडण्यात येणार आहे. अकोला विभागात एकूण नऊ आगार आहेत. यात्रा कालावधीत या नऊ आगारातून एकूण २०० बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील वर्षी १७७ गाड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे सोडण्यात आल्या. यावर्षी २०० गाड्यांचे नियोजन केले आहे. सध्या एसटीमध्ये ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आहे. महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आहे. यामुळे या वर्गाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा विचार करून यंदा बस गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.