अकोला : बी.आर. हायस्कूल व मुख्य पोस्ट ऑफिस यामध्ये महानगरपालिकेची मोठी मोकळी जागा आहे. या जागेवर असामाजिक तत्वांतर्फे पूर्वी अनेकदा अनधिकृतरित्या कब्जा करण्याचे प्रयत्न झालेत.
या जागेवर नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे, त्या अंतर्गत छोटेखानी बगिचा, नागरिकांना बसण्यासाठी बाक, वॉकिंग ट्रॅक बनवावा यासाठी माजी नगरसेविका उषा विरक यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केला. कामाची सुरुवात होऊन कमानी उभारून लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेत. परंतु अकोलेकरांचे दुर्दैव नेहमी प्रमाणे आडवे आले. नगररचना विभागातर्फे हरकत घेण्यात आली. जागा महानगरपालिकेची असली तरी कुठल्या कारणासाठी आरक्षित आहे, या बाबत संदिग्धता असल्यामुळे निर्माणाधीन विरंगुळा केंद्राचे काम बंद पडले.
नगररचना विभागातर्फे सुधारित विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. या जागेचा वापर कुठल्या प्रयोजनासाठी करायचा, हे आराखड्याचे काम पूर्ण झाल्यावरच निश्चित होईल. यावर विरंगुळा केंद्राचे भवितव्य अवलंबून आहे. ही जागा असामाजिक तत्वांच्या ताब्यात जाता कामा नये. येथे विरंगुळा केंद्रच निर्माण व्हावे, अशी अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.