यवतमाळ : सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने वणी पोलिस
ठाण्याच्या परिसरातच शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सापळा रचून वेकोलिच्या अधिकाऱ्यास अटक केली. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला सातत्याने पैशांची मागणी केल्याबाबत घेन्सा येथील एरीया सबमॅनेजर गौतम बसुतकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ट्रान्सपोर्टरकडुन अधिकाऱ्याने ३ लाख १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी एक लाख रुपयाची लाच घेताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे वेकोली क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घोन्सा येथील कोळसा खाणीत कार्यरत ट्रान्सपोर्टला पैशांसाठी छळण्यात येत होते. वेकोलिच्या या अधिकाऱ्याविरोधात संबंधित ठेकेदाराने सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. घोन्सा येथील कोळसा खाणीतील कोळसा विकण्यासाठी टेंडर काढले जाते. काही कंपनीच्या संचालकानी कोळसा वाहतुकीचे हे कंत्राट घेतले होते. गौतम कुमार हे सतत वाहतूक कंत्राटदाराला दहा लाख रुपयांची मागणी करीत होते.