Nagpur : प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्णू मनोहर यांनी सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी अयोध्या येथील हनुमान गढी आखाडा येथील श्री हनुमत संस्कृत पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या आवारात सात हजार किलो ‘श्री राम भोग हलवा’ बनवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. हनुमान गढी येथे उपस्थित हजारो भाविकांनी हा प्रसाद स्वीकारला आणि विष्णू मनोहर यांना आशीर्वाद दिला.
सकाळी सात वाजता मंत्रोच्चार आणि शंखध्वनीच्या आवाजात चुलीचे पूजन केल्यानंतर मनोहर यांनी ‘कारसेवा ते पक्षसेवा’ या संकल्पनेने प्रेरित होऊन त्यावर ‘राम’ असे लिहिलेले विशेष वस्त्र परिधान केले. विष्णू मनोहरजी यांनी श्री राम भोग हलवा बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी भाविकांनी अखंड रामरक्षा 11 वेळा पठण करून विष्णूंचा उत्साह वाढवला. चार तासात बनवलेला श्री राम भोग हलवा भक्तीमय वातावरणात तयार झाला.
700 किलो रवा, 800 किलो तूप, 1 हजार 120 किलो साखर, 4 हजार 500 लिटर पाणी (मिनरल वॉटर), 21 किलो वेलची पावडर, 21 किलो जायफळ पावडर, 250 डझन केळी यात वापरण्यात आले. 10 फूट बाय 10 फूट चुलीवर श्री राम भोग हलवा तयार करण्यात आला. यामध्ये काजू, बेदाणे, बदाम इत्यादी सुमारे 200 किलो सुका मेवा वापरण्यात आला. श्री राम भोग हलवा तयार करण्यासाठी चार तास लागले. यानंतर राम मंदिरात स्थापित भगवान श्री रामजी आणि हनुमान गढीतील भगवान श्री हनुमानजींना नैवेद्य दाखवण्यात आला.
हनुमान गढी अयोध्याधामचे श्री 108 महंत प्रेमदास महाराज गद्दीनसीन, आखाड्याचे महंत श्री मुरलीदास महाराज, संकटमोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय दास महाराज, डॉ. महेश दास, पुजारी हेमंत दास, महंत संतराम, रामशंकर दास, नंदराम दास, राजेश पहेलवान, सत्यदेव दास, उपेंद्र दास, मणिराम दास पहेलवान, मामा दास, लवकुश दास, इंद्रदेव दास पहेलवान, लक्ष्मण दास महाराज आदी यावेळी उपस्थित होते.