Nagpur : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला आहे. तीन जागांबाबत चर्चा तेवढी शिल्लक आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायला तयार आहोत. पण आंबेडकरांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे सध्या कळेनासे झाले आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. बोलणी पूर्ण होताच सर्व पक्षांना सन्मानपूर्वक जागा वाटपाचा निर्णय होईल, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना केले. पुरोगामी विचारांच्या लोकांना आंबेडकर हे महाविकास आघाडीत यावे असे वाटत असल्याचे ते म्हणाले.
राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील सगळे अनियंत्रित झाले आहेत. बुलढाण्यातील युवकाला मारहाणीच्या घटनेतून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अंगात असलेली खलनायक वृत्ती समोर आली आहे. सत्ताधारी आमदारांना कायदा आपल्या मालकीचा वाटायला लागला आहे.आमदार संजय गायकवाड यांनी तरुणाला केलेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून कारवाई होणे अपेक्षित आहे. नागपुरातील एका महिलेची जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सत्तेची त्यांना प्रचंड मस्ती आहे. स्वत:जवळ पैसा अमाप आहे. पैसा जिरवून होत नसल्याने असे धंदे ते करीत आहेत. आपण पत्र लिहून गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यांच्यावर झालेले आरोप राजकीय होते. त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे देशमुख आता बोलत आहेत. त्यात गैर काहीच नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार
समृद्धी महामार्गामुळे आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. या अपघातांवर उपायांची आवश्यकता होती. जग अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे. समृद्धी महामार्गाच्याबाबत असे काहीच झालेले नाही. आता या महामार्गावर खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. रस्त्यांच्या कामाची 2 हजार 400 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. कमी किमतीची निविदा फुगविण्यात आली आहे. अशा कामामुळेच अनेकांचे जीव गेल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.