Home » Lok Sabha Election : आंबेडकर विरुद्ध गांधी वाद उफाळला 

Lok Sabha Election : आंबेडकर विरुद्ध गांधी वाद उफाळला 

Tushar Gandhi :‘वंचितला करू नका मतदान ’, तुषार गांधी यांचे आवाहन

by admin
0 comment

Political News : महाविकास आघाडीशी जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी मविआच्या विरोधात उमेदवारही उभे केले. यावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या या पवित्र्यावर प्रखर टीका केली आहे. त्यामुळे इतिहासातील प्रसिद्ध अशा ‘आंबेडकर विरुद्ध गांधी’ या वादाची आठवण ताजी झाली आहे.

तुषार गांधी म्हणाले…

प्रसारमाध्यमांशी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, भाजपाची युती ही गद्दारांची युती आहे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहनही तुषार गांधी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, “आमची कितीही चांगली मैत्री असली तरी जे चूक आहे, त्याला चूकच म्हणायची वेळ आली आहे. यापूर्वी जी चूक झाली, तीच पुन्हा होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवायची ही शेवटची संधी आहे.”

वंचितने चढवला तुषार गांधींवर हल्ला

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी तुषार गांधी यांच्या टीकेनंतर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “प्रस्थापित पक्ष आणि त्या पक्षांच्या राजकारणाला मदत करणारे सहयोगी घटक, शोषित आणि वंचितांचे राजकारण उभे राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा असाच विरोध झाला होता. डॉ. बाबासाहेब हे इंग्रजांचे हस्तक असल्याचे बिंबवण्यात आले होते. तसाच गैरसमज आता प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत पसरविल्या जात आहे. ज्या शोषित, वंचितांना राजकारणात येऊ दिले जात नाही, ज्यांच्या पाल्यांपर्यंत लोकशाही पोहचू दिली जात नाही, अश्या घटकांना प्रकाश आंबेडकर मुख्य प्रवाहात आणू इच्छित असल्यामुळे प्रस्थापितांना हे सहन होत नाही.

भाजपमध्ये गेलेले, भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांबाबत तुषार गांधींचे काय म्हणणे आहे? असा आमचा सरळ प्रश्न आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांपैकी कुणीही उद्या भाजपाबरोबर जाणार नाही, याची खात्री तुषार गांधी देऊ शकतात का? आम्हाला भाजपची बी टीम म्हणणं सोपे आहे. मात्र यांच्याकडचे नेते कधी तिकडे जातील, याचा नेम नाही. ज्या काँग्रेस पक्षाची बाजू तुषार गांधी नेहमी उचलून धरतात, त्या काँग्रेसचे प्रवक्ता परवा शिंदे गटात गेले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले आता एकनाथ खडसे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपामध्ये जात आहेत, यावर तुषार गांधी यांचे काय म्हणणे आहे? असे प्रश्न वंचित बहूजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी उपस्थित केले आहेत.

error: Content is protected !!