Akola : महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश न झाल्याने ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात झालेल्या सभेत ‘मविआ’च्या नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला. (Lok Sabha Election 2024)
आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असे विधान त्यांनी केले. आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर निवडणुका तोंडावर आल्या आहेत अन् कॉंग्रेस यात्रा काढत आहे, ही यात्रा म्हणजे डोंबाऱ्यांचा खेळ आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झाले नाही. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणारं नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर तुम्हालाही गाडू, असा इशाराच आंबेडकर यांनी दिला. मविआतील नेत्यांनी आधी त्यांच्या जागा वाटून घ्याव्या. वाटाघाटी झाली नाही तर आम्ही आमच्या 48 च्या 48 जागा लढवणार आहोत. आमची तयारी झालेली आहे. आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
वंचितमधील कोणीही तुरुंगात जाणार नाही. गेले तर सोनिया गांधींपासून सगळे जेलमध्ये जातील. पण प्रश्न हा आहे की, तुम्हाला लढण्याची इच्छा आहे का? मोदींना (Narendra Modi) हरवण्याची इच्छा आहे का? तुमच्या मानगुटीवर तलवार आहे. एकत्र लढले तर तलवार हटवली जाईल. आघाडी केली तर वाचाल. नाही केली तर जेलमध्ये जाल एवढं मात्र नक्की आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस यात्रेला निघाली असताना इकडे निवडणूक पार पडेल. निवडणूक तोंडावर आली आहे. उद्या निवडणूकला तोंड द्यायचं आहे. निवडणूकीला तोंड देण्याएवजी हे भारत जोडो यात्रा काढत आहेत. याला मी डोंबाऱ्याचा खेळ म्हणतो, अशी टीकाच त्यांनी केली.
Akola News : सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 370 वरील आदेशावर प्रकाश आंबेडकर नाराज