अकोला : अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डाेळ्यात आसू पाहायला मिळत आहेत. अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका अकाेला, तेल्हारा तालुक्यातील फळबागांना बसला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात प्रचंड पाऊस झाला हाेता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला. सलग आठ दिवस झालेल्या पावसाने पीक वाया गेले. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे आताेनात नुकसान झाले. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा असतानाच साेमवारी रात्री व मंगळवारीही अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. परिणामी रब्बी पिकांच्या रुपाने हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावल्या गेला आहे.
हातरूण, नया अंदुरा या भागातील मालवाडा, शिंगाेली, लाेणाग्रा, बाेरगाव, हातला, कंचनपूर याभागात पाऊस झाला.परिणामी साेंगून ठेवलेला हरभरा ओला झाला. कवठा बहाद्दुरा, आलेगाव, आगर, लाेहारा या भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी कांदा व हरभरा पिकाचे नुकसान झाले. अकाेट व तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. परिणामी फळबागांचे नुकसान झाले आहे. संत्रा, गहूसह अन्य पिकांची हानी झाली आहे.