Home » अख्ख्या ठाकरे कुटुंबाचे लक्ष वेधणाऱ्या ‘फायर आजी’

अख्ख्या ठाकरे कुटुंबाचे लक्ष वेधणाऱ्या ‘फायर आजी’

by नवस्वराज
0 comment

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अख्ख्या ठाकरे कुटुंबाला आपल्या घरापर्यंत येण्यास भाग पाडणाऱ्या ‘फायर आजी’ची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. या आजींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी, पुत्र तथा मंत्री आदित्य आणि तेजस हा अख्खा परिवार गेला होता. कोण आहेत या ‘फायर आजी’ जाणून घेऊया.

शिवसेनेच्या रणरागिणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या ‘फायर आजी’चे नाव चंद्रभागा शिंदे. शिंदे आजींचे वय ८० वर्षे. आजींच्या एका कृत्यानंतर संपूर्ण ठाकरे परिवार परळ येथील दाभोळकर वाडीत पोहोचला. बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी सध्या शिवसेनेला टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले. या शिवसैनिकांमध्ये ८० वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आजींचाही समावेश होता. या आजींनी आंदोलनादरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. म्हातारपणात सुद्धा तरुणाला लाजवेल अशा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून चंद्रभागा शिंदे यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री ठाकरेंनी या आजींची भेट घेतली.

 

एवढ्यावरच ठाकरे थांबले नाही तर आजींच्या भेटीसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब परळच्या त्यांच्या घरी गेले होते. आजींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हापूस आंब्याच्या चार पेट्या घेऊन गेले. भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आजीचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी सुद्धा आजीबरोबर फोटो काढले, त्यांच्या आशीर्वाद घेतला. चंद्रभागा शिंदे आजींसारखे शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याने मला मिळालेला सर्ंवात मोठा आशीर्वाद आहे. ‘माणसाचे वय कितीही वाढले, तरी तो मनाने तरुण हवा’, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढले आहे, पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. मातोश्रीवर येऊन गेलात, आता वर्षावर सहकुटुंब या, असे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे.

error: Content is protected !!