Nagpur : महानगरातील सुरू असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामावर मजुरी करणाऱ्या एका मजुराच्या दोन बहिणी आपल्या भावाकडे राहाण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या भावासोबत राजू बल्लू गोस्वामी (वय 20) आणि देवा चेतराम गोस्वामी (वय 24) हे देखील मजुरी काम करायचे. भावासोबत मजुरी करणारे मित्र देवा आणि राजू यांचे नेहमीच घरी येणे जाणे सुरूच रहायचे. राजू आणि देवा यांची नजर मित्राच्या बहिणींवर पडली. त्यांनी दोन्ही बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्याचे ठरवले. भाऊ घरी नसताना राजू आणि देवा मित्राच्या बहिणींशी गप्पा गोष्टी करायचे. महिन्याभरात दोन्ही बहिणी देवा आणि राजूच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या. प्रेमात अडकलेल्या दोन्ही तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी असून एकीचे वय 17 तर दुसरीचे वय 19 आहे. त्यांना पळवून नेल्याची घटना नागपुरात घडली आहे.
देवा आणि राजू यांनी दोन्ही तरूणींसोबत पळून जाऊन मध्य प्रदेशातील सिवनी येथे लग्न करण्याचे ठरवले. मॉन्टी बल्लू गोस्वामी (वय 20) आणि मोहन चेतराम गोस्वामी (वय 20) यांनी दोघी बहिणींना पळून जाण्यासाठी मदत केली. नियोजनानुसार दोघी बहिणी औषधी आणण्याचे कारण सांगून घराबाहेर पडल्या. त्यांना राजू आणि देवाने सिवनी येथे पळवून नेले. तिथे एका मित्राच्या घरी ते मुक्कामी राहिले. बहिणी घरी न परतल्यामुळे भावाने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी गुन्हे शाखेचे मानवी तस्करी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या सोबत तातडीने तपास सुरू केला. देवा आणि राजू यांची माहिती मिळताच पोलिस त्यांचा मागावर निघाले. चौघांनीही लग्नाची तयारी सुरू केली होती. लग्नासाठी दागिने आणि कपडे खरेदी केले होते. लग्नाची तयारी सुरू असतानाच गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौघांनाही मध्य प्रदेशातील सिवनी येथून नागपुरात परत आणले. तरुणींना भावाच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त डाॅ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता तोडसे, रेखा संकपाळ, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, श्याम अंगथुलेवार, दीपक बिंदाने, विलास विंचुलकर, अश्विनी खोडपेवार, पल्लवी वंजारी, ऋषिकेश डुंबरे, शरीफ शेख यांनी कारवाई केली. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.