Theft News : अकोला शहरात एका रात्रीतून तब्बल नऊ दुकानांमध्ये चोरी झाली आहे. नऊ दुकानांचे शटर एकाच पद्धतीने वाकवून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्त किती कमकुवत ठरत आहे, याचा प्रत्यय आला. बुलेटवरून आलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळीने नऊ दुकानांमध्ये हैदोस घातला. काही साहित्य व रोकड लंपास केली. रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अलंकार मार्केट परिसरातील सहा दुकानांमध्ये ही चोरी झाली आहे. दगडी पुलाजवळ असलेल्या नागपुरी जीन परिसरातील दोन दुकानांमधूनही ऐवज पळविण्यात आला आहे. वाशिम बायपास येथील एक किराणा दुकानही फोडण्यात आले आहे.
चोरीमध्ये नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला याची जुळवाजुळव करण्यात येत आहे. शारदा ईलेक्ट्रिकल्स, टेकट्रिक ईलेक्ट्रिकल्स, प्रशांत ट्रेडर्स, के. के. ट्रेडिंग कंपनी, ईश्वर एंटरप्रायजेस, श्रीजी मार्केटिंग, जैन उद्योग, गायत्री पॉलीट्रेड, संतोष किराणा या दुकानांमध्ये ही चोरी झाली आहे. शटर तोडताना काही तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले आहेत. चोरटे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. एकाच रात्रीतून चोरट्यांच्या टोळीने शहराला लक्ष्य केल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे चोरट्यांना वेळीच जेरबंद करण्यासाठी अकोला पोलिसांचा (Akola Police) चांगलाच कस लागणार आहे.