Home » भारनियमनाच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

भारनियमनाच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारनियमनामुळे अकोलेकर चांगलेच हैराण झाले असून रात्री-अपरात्रीही वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांना अखंड वीज पुरवठा करता यावा, यासाठी अकोलासारख्या शहरांवर वेळीअवेळी भारनियमनाची कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. या भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने अकोल्यात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयावर धडक देत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अकोला पश्चिमचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे शहर प्रमुख राहुल कराळे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, युवासेना जिल्हा अध्यक्ष अभय खुमकर, सहसंघटक तरुण बगेरे, युवासेना शहर अध्यक्ष नितीन मिश्रा, नितीन ताकवाले यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला.

अकोल्यात वीजहानी जास्त असल्याचे कारण दर्शवित महावितरण आपत्कालीन भारनियमन करीत आहे. वास्तविकतेत महावितरणचे अधिकारीही वीज गळतीला तितकेच कारणीभूत आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वीज चोऱ्या होत आहेत. मात्र त्याचा भुर्दंड सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागत असल्याची टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. उत्सवांच्या काळात भारनियमन सुरू करण्यात आल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. अशात महावितरणने यावर तोडगा न काढल्यास ठाकरे गट उग्र आंदोलन करेल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!