अकोला : महानगरपालिकेतर्फे शनिवारी सकाळी मुख्य मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहीमेदरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व व्यावसायिक यांच्यात झटापट झाली. मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले. याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
10 डिसेंबर रोजी सकाळी मनपाने गांधी रोडपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीमेला प्रारंभ केला. ही मोेहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल, गांधी चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली या मार्गाने राबविण्यात आली. गांधी मार्गावरील व्यावसायिक वाणिज्य संकुलातील दुकानांसमोर व्यवसायकांनी दुकानात जाण्यासाठी लोखंडी पिंजरे ठेवले आहे. हे पिंजरे ग्राहकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे मनापाच्या पथकाने पिंजरे जप्त करण्यास सुरुवात केली. या कारवाईला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. गांधी रोडवर रस्त्याच्या कडेला तयार कापडाचे दुकाने आहेत. त्यांनीही कारवाईला विरोध केला. त्यामुळे मनपा पथक व संबंधित व्यापाऱ्यांमध्ये झटापट झाली. दोन्हीकडून धक्काबुक्की करण्यात आली.मनपाच्या पथकाने विरोध झुगारून कार्यवाही सुरूच ठेवली.