Home » Akola, Buldhana, Amravati : बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांत तणाव, अकोल्यात दगडफेक

Akola, Buldhana, Amravati : बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांत तणाव, अकोल्यात दगडफेक

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : बुलढाणा जिल्ह्यात समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. खामगाव, चिखली व जळगाव जामोद तालुक्यांमध्ये या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संग्रामपूर येथून ही पोस्ट व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तामगाव पोलिसांनी याप्रकरणात एका व्यक्तीला अटक केली होती. परंतु मंगळवारी (ता. २१) ही पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव जामोद, बोरी आडगाव येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बोरी आडगाव येथे रस्त्यावर टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Tension After Social Media Post in Buldhana Amravati Tension in Akola Due To Clash In Two Groups)

बुलढाणा जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहै. खामगाव, चिखली व जळगाव जामोद तालुक्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. बोरी आडगाव येथे रास्तारोको केल्यानंतर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. मंगळवारी घडलेल्या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील वादग्रस्त पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायरल होत अमरावती जिल्ह्यातही पोहोचली. बुलढाणा जिल्ह्यातील आक्षेपार्ह पोस्टचे लोण पसरल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे तणाव निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ ‘गाव बंद’ची हाक देण्यात आली. गावातील दुकाने बंद करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांनी रिद्धपूर गावातील बंदोबस्तात वाढवला असून पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना राष्ट्रीय श्रीराम सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

जातीय तणाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक सोशल माध्यमांवर समाजकंटक पोस्ट व्हायरल करीत असून हा प्रकार पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचे वाटते, त्यामुळे प्रशासनानं असे कृत्य करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

अकोला येथील अकोटफैल भागात वाद निर्माण झाल्यामुळे दोन समुदायातील गट समोरासमोर आले ज्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले सोमवारी (ता. २१) रात्री उशिरा ही घटना घडली. याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या. दोन समुदायातील दोन परिवारांमध्ये वाद चिघळल्यानंतर दगडफेक झाली होती. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील जनजीवन सुरळीत असल्याचे अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अकोला पोलिसांना दिले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!