Nagpur : महाराष्ट्रात होळी साजरी होत असतानाच उष्णता वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरडय़ा हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऱ्यासोबतच यंदा उकाड्यात प्रचंड वाढ होण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. कमाल तापमानातही वाढ होत आहे. होळीनंतर पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवाही आता कमी होत जाणार आहे. सकाळी नऊ पासूनच उन्हाची तीव्रता विदर्भात जाणवायला लागेल असे हवामान विभागाने नमूद केले आहे.
तापमानाचा पारा ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यावरून येत्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. मात्र होळीनंतर पारा चाळीशीच्या पार जाईल असे हवामान खात्याने नमूद केले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट 40 अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.
विदर्भातील थर्मामीटर
अकोला : कमाल 40.5, किमान 23.2, अमरावती : कमाल 39.4, किमान 22.9, बुलढाणा : कमाल 37.6, किमान : 24.0, ब्रह्मपुरी : कमाल 40.0, किमान 23.6, चंद्रपूर : कमाल 38.8, किमान 21.6, गडचिरोली : कमाल 36.6, किमान 21.0, गोंदिया : 37.5, किमान 22.0, नागपूर : कमाल 39.2, किमान 22.6, वर्धा : कमाल 39.9, किमान 23.2, वाशीम : कमाल 39.8, किमान 18.4, यवतमाळ : 40.2, 22.5. आगामी सात दिवसात विदर्भात सर्वत्र तापमान वाढीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वच जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होणार असले तरी त्यामुळे उकाडा वाढण्याचे संकेत आहेत.