बुलडाणा : माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनावर छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवार, १२ सप्टेंबरला दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
मलकापूर अर्बन बँकेचा हा वाद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर संतापलेल्या ठेवीदारांनी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनाला लक्ष्य केले. संतापलेल्या जमावाने छत्रपती संभाजी नगरात संचेती यांच्या वाहनाचा पाठलाग करीत दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मलकापूर बँकेच्या ठेवीदारांची बैठक सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती हे देखील पोहोचले. बँकेत सुमारे ४०० ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे येथे जमलेले लोक चांगलेच संतापले होते. जमावाने बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. ‘बँकेला ४७ कोटी ९१ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. आम्ही आरबीआयच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाकडे अपिल दाखल केले आहे. २६ सप्टेंबरला त्याची दिल्लीत सुनावणी आहे. निकाल आमच्या बाजुने लागले व बँकेला पुन्हा परवानगी मिळेल’, असे संचेती सांगत होते. मात्र लोक अधिक संतापले. ‘राजकीय भाषा बोलण्यापेक्षा पैसे कधी देणार ते स्टॅम्पपेपरवर लिहुन द्या’, अशी मागणी ठेवीदारांनी केली. त्यापैकी काही जण बैठकीच्या मंचावर चढले व त्यांनी माजी आमदार संचेती यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी तैनात पोलिसांनी संचेती यांना बैठकीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
संचेती बाहेर पडताच जमावातील युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस सुरक्षेत संचेती यांना त्यांच्या वाहनापर्यंत आणण्यात आले. मात्र जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक सुरू केली. या दगडफेकी संचेती यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. माजी आमदार संचेती यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरात झालेल्या या प्रकाराची माहिती बुलडाणा जिल्ह्यात पोहोचताच संचेती विरोधकांनी मलकापूरसह जिल्ह्यात त्यांच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली. ठेवीदारांच्या सभेतील गोंधळाचे व संचेती यांच्या वाहनावरील दगडफेकीचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आले. विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना संचेती यांनी सांगितले की, आजघडीला बँकेकडे ६६९ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. १२० पतसंस्थांच्या ठेवींची संख्या २१७ कोटी आहे. उर्वरीत ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी सामान्य ठेवीदारांच्या आहेत. ठेवीदारांची रक्कम सहज देता येऊ शकते. आरबीआयची परवानगी मिळाली की बँक मार्च २०२४ पर्यंत सर्व ठेवीदारांची रक्कम व्याजासह देईल.