मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही महाविकास आघाडीवर ‘प्रहार’ केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर कडू यांनी महत्वाचे विधान केले आहे.
शिंदेनी शिवसेनेच्या जवळपास दोन तृतीयांश आमदारांना फोडल्यामुळे पक्षात मोठी फळी निर्माण झाली आहे. अशात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. शिवसेनेसोबत बच्चू कडूंसारख्या काही अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदेंना आहे. शिवसेना आणि अपक्षांसोबत काही काँग्रेस आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
सध्या मी गुवाहाटीत आहे. आज सर्व बंड केलेल्या आमदरांची बैठक होणार आहे. रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची योजना आखली जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. सध्या गुवाहाटीत शिवसेना आणि अपक्षांचे मिळून ३६ आमदार एकत्र आहेत. आणखी ३ ते ४ आमदार येणार असून केवळ शिवसेनेच्या आमदारांचा आकडा ३९ पर्यंत जाईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तर अपक्षांना मिळून हा आकडा ५० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी डॉ. संजय कुटे हे सूरत आणि गुवाहाटी येथे बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेच्या आमदरांकडे लक्ष देण्याची गरज होती. परंतु पक्षाकडून आमदारांकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे प्रचंड नाराजी असल्याचे बच्चू कडू म्हणाले.