Washim : जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, घाम गाळत जगाला पोसणारा शेतकरी आता स्वत:चे घर कसे पोसायचे या विवंचनेत पडला आहे. पीक पूर्ण घेऊन हाती आलेला माल विकायला आल्यावर सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी निराश झाला आहे. सोयाबीनचे बाजार भाव हे काही ठिकाणी आवक कमी असल्याने बाजार भाव चांगले मिळाले, तर काही ठिकाणी मागणी कमी आणि आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव हवे तसे मिळाले नाही. सर्वांत चांगला बाजार भाव चिमूर बाजार समिती मध्ये 5 हजार ईतका मिळाला, तर सर्वांत कमी बाजार भाव हा लासलगाव (विंचूर) येथे 3 हजार मिळाला आहे.
सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन घेणे परवडेल. जर सोयाबीन बाजार भाव कमी मिळत राहिले, तर वाढती मजुरी आणि बाकीचे इतर उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या खिशात काहीही राहणार नाही. सरकारने सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल तसेच चांगला हमीभाव देण्याचे धोरण आणले पाहिजे. सोयाबीनचे बाजार भाव असेच कमी होत गेले तर शेतकऱी या पिकाकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत
आर्थिक संकट
केंद्र सरकारने 4 हजार 600 रुपये हमीभाव जाहीर केला. किमान यापेक्षा जास्त भाव मिळणे अपेक्षित असताना सध्या बाजारात मात्र सरासरी 4 हजार 200 रुपये दर मिळतोय. दर आणखी कमी होण्याच्या भीतीने काही शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.