Home » सहा महिन्यांनंतरही अकोल्याचा उड्डाणपूल बंदच

सहा महिन्यांनंतरही अकोल्याचा उड्डाणपूल बंदच

by नवस्वराज
0 comment

अकोला : मोठा वाजागाजा करीत उभारण्यात आलेला अकोल्यातील उड्डाणपूल सहा महिने उलटले तरी वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. सर्वकाही हाती असतानाही अकोल्यातील या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी तोडगा काढु शकलेले नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल अपघात आणि शोभेचे कारण ठरत आहे. आता या उड्डाणपुलावरून अकोल्यात संतापही व्यक्त होत आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी अकोल्यात मोठ्या थाटामाटात या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर पुलाखाली असलेली जलवाहिनी फुटली आणि पुलाचे श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावलेल्या नेत्याचे स्वप्न धो धो वाहुन गेलेत. हा उड्डाणपूल सुरू व्हावा यासाठी प्रचंड आटापिटा राज्यातील सत्ताधारी मंडळींनी केला. परंतु त्याला यश आले नाही. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकांना होत असलेल्या गैरसोयीमुळे या पुलाजवळ आंदोलन केले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात राजेश मिश्रा, गोपाल दातकर आदीं असंख्य पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या तळाशी आंदोलन केले. या आंदोलनानंतर तरी हा उड्डाणपूल सुरू होईल, असे अपेक्षित होते. मात्र पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी तोडगाच सापडत नसल्याने पूल असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे.

सोमवार २९ मे २०२३ रोजी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला एक वर्ष झाले. त्यानंतरही सहा महिन्यातच बंद पडलेल्या या उड्डाणपुलाकडे पुन्हा लक्ष वेधले ते ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारसकर यांनी. पारसकर यांनी या पुलाजवळ फलक लावत उड्डाणपूल आणि अंडरपास पावसाळ्याच्या दिवसात किती अडचणीचा ठरणार आहे, या आशयाचे फलक लावले आहेत. नागपुरातील एक अंडरपास असाच अडचणीचा ठरत आहे. या अंडरपासमध्ये तर भर उन्हाळ्यातही पाणी साचते. हा अंडरपास आहे. नरेंद्र नगरचा रेल्वे अंडरपास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा अंडरपास आहे. या अंडरपासमध्ये यापुढे पाणी साचणार नाही, असे आव्हान नागपुरातील भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने स्वीकारले होते. मात्र हा नेता कालांतराने निवडणुकीतही पडला आणि अंडरपासच्या मुद्द्यावरही. असाच प्रकार आता अकोल्यातील उड्डाणपूल आणि अंडरपासच्या बाबतीत बघायला मिळत आहे.

अकोल्यातील उड्डाणपूल आणि अंडरपास ही वाढत्या वाहतुकीनुसार काळाची गरज होती. परंतु उड्डाणपूल उभारताना योग्य नियोजन करण्यात न आल्याने आता हाच उड्डाणपूल भाजपाविरोधकांच्या हाती आयते कोलीत ठरला आहे.  या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर भाजपाविरोधक आता नागरिकांमध्ये संताप निर्माण करीत आहेत. सोशल माध्यमांवर सोमवारी अकोल्यातील अनेक इन्स्टा खातेधारकांनी अकोल्यातील उड्डाणपूल बंद असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांना कोसले. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामचा वापर सर्वाधिक तरुणाई करते.  अकोल्यातील उड्डाणपुलाशिवाय डाबकी मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही रखडले होते. याचे खापर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर फोडले आहे. आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. डाबकी रोड रेल्वे फ्लायओव्हरचा मुहूर्तही जाहीर करण्यात आला आहे. मात्र हा उड्डाणपूल अशोक वाटिका उड्डणपुलाप्रमाणे त्रासदायक ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ईतकेच नव्हे तर अशोक वाटिकाजवळ बंद पडलेला उड्डाणपूल सुरू करण्याचे आव्हानही सत्ताधाऱ्यांना स्वीकारावे लागणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!