Nagpur News : नवनीत राणा यांनी मध्यरात्री नागपुरात येऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याबद्दल शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाई गडबडीने येतात असे, अडसूळ यांनी नमूद करीत राणा यांना निवडणुकीत तीव्र विरोध करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास यावेळी अडसूळ यांनी व्यक्त केला आहे.
अमरावतीमधून नवनीत राणा विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का? या प्रश्नावर ही अडसूळ यांनी सूचक वक्तव्य केले. अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करायचा की नाही हे अजून ठरवलेले नाही. अजून दोन दिवस वाट पाहणार आहोत. राणा यांच्याबात कोर्टाचा निर्णय यायचा आहे. त्यावर सर्व अवलंबून आहे, असे अडसूळ म्हणाले. जे घडायचे असते ते कधीही घडू शकते. नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशासाठी घाई म्हणून त्या कायम राहतीलच असे नाही, असेही अडसूळ म्हणाले.
शिवसेनेच्या जागा मिळविण्यासाठी भाजपने खोट्या सर्वेक्षणाचा आधार घेतला. या प्रश्नावर अडसूळ यांनी सांगितले की आपल्या बाबतीत असे घडलेले नाही. मात्र अशा आरोपांबद्दल आपणही ऐकले आहे. त्यात किती तथ्य आहे, हे माहिती नाही. जेव्हा उमेदवारी द्यायची नसते तेव्हा सर्वेचे कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते असे, अडसूळ म्हणाले. यवतमाळ-वाशीम मतदारसंघामध्ये भावना गवळी याच उमेदवार राहणार आहेत. कदाचित शिवसेनेचे उमेदवार जाहीर होऊ शकतात, अशी माहितीही अडसूळ यांनी दिली.