Buldhana : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे. ते बुलढाणा येथे दौऱ्यावर होते. तेथील जनतेशी संवाद साधताना त्यांनी राजमाता जिजाऊंचा उल्लेख केला. सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आणि हुकुमशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची जिद्द हरपली आहे. जिद्द गेली कुठे? बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला एवढे मोठे दैवत दिले, त्यांना आपण विसरलो आहोत. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढण्याची जिद्द ज्या दैवताने आपल्याला दिली त्यांचे मातृस्थान बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना गद्दार टिमक्या वाजवत असतील आणि बुलढाणेकर बघ्याची भूमिका घेत असतील तर तुमची जिजाऊंचे नाव घेण्याची, जय जिजाऊ म्हणण्याची योग्यता नाही, असे ते म्हणाले.
घराणेशाहीच्या विरोधात असल्याचा प्रचार भाजपावाले करतात. पण आम्ही हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही. जसे तुम्ही तिथे जय शहाला बसवले. माझं घराणे प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, अमित शाह यांचे क्रिकेटमधील योगदान काय? जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील क्रिकेटचा सामना अहमदाबादला नेणे एवढेच त्याचे कर्तृत्त्व आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
ठाकरे म्हणाले, तुम्हाला जुने काँग्रेसवाले पुन्हा हवे असतील तर भाजपाला मतदान करा. जुने काँग्रेसवाले आमदार-खासदार करा. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या लोकशाहीत राहाव्यात की, हुकुमशाहीत जगाव्यात. यादृष्टीने विचारपूर्वक मतदान करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही किंवा ज्यांचे कवडीचे योगदान नव्हते, त्यांच्या झोळीत भारतमातेला टाकणार का? असा भावनिक प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. जर टाकायचे नसेल तर यापुढे फक्त आपल्याच शिवसेनेला मतदान करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. दुसरी शिवेसना मी मानत नाही. माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेले नाव कोणी त्यांना देत असेल तर ही लोकशाही आहे. त्याच लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचे नाव बदलून धोंड्या ठेवतो. शिवसेना ही आमचीच आहे, अशी प्रखर टीका उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली.