चंद्रपूर : महिला पोलिसांना ड्युटीवर तैनात असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसांना नैसर्गिक विधी पार पाडताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही समस्या लक्षात घेता चंद्रपूर पोलिस विभागाने महिलांसाठी खास फिरते प्रसाधनगृह असलेले शी-व्हॅन हे वाहन तयार केले आहे.
टाकाऊ वाहनांपासून शी-व्हॅनची निर्मिती करण्यात आल्याची माहिती चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. मोटार वाहन विभागाने शी व्हॅन हे फिरते प्रसाधनगृह निर्माण केले आहे. पोलिस मोटार परिवहन विभागातील एक जुन्या चारचाकी वाहनाचे नूतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरुमसह पाणी व फॅनची व्यवस्था केली आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शी व्हॅन ही संकल्पना राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या व्हॅन सुरू करुन बंदोबस्तादरम्यान महिला पोलिसांना होणारा त्रास दूर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभरातील पोलिस विभागातील भंगार गाड्यांना नवे रूप देण्यात येईल असे मतदेखील परदेशी यांनी व्यक्त केले.