नवी दिल्ली : एलॉन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या स्टारलिंक कंपनीचा भारतात प्रवेश करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे ही कंपनी आता लवकरच भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी परवान्याशिवाय सेवा सुरू केल्याबद्दल या कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता मस्क सर्व सरकारी मंत्रालयांची मंजुरी घेतल्यानंतर स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
स्टारलिंक सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर, जिओ आणि एअरटेलच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण आता एअरटेल आणि जिओ दोघेही सॅटेलाइट इंटरनेटच्या रेसमध्ये सामिल झाले आहेत. एअरटेल वन वेबसोबत सॅटेलाइट सर्व्हिस लॉन्च करत आहे. तर जिओनेही लक्झेंबर्गची कंपनी एसईएस सोबत सॅटेलाइट सर्व्हिससाठी भागिदारी केली आहे. स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसची टॉप स्पीड 1.5 ते 2 जीबीपीएस एवढी असल्याचा दावा केला जात आहे. नावाप्रमाणेच ही एक सॅटेलाइट सर्व्हिस आहे. यामुळे हिला मोबाइल टॉवरची आवश्यकता लागणार नाही. यामुळे देशातील दुर्गम भागांमध्येही सहजपणे इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत मिळेल.
स्टारलिंक सध्या 40 पेक्षा अधिक देशांत सेवा देत आहे. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सर्व्हिसमध्ये वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय, केबल आणि एक माउंटिंग ट्रायपॉड दिला जातो. हे राउटर सॅटेलाइट कनेक्टेड असते. स्टारलिंकने 2021 मध्ये लायसन्स न घेतात आपली सर्व्हिस सुरू केली होती. याच बरोबर, त्यांनी ग्राहकांकडून सर्व्हिस सुरू होण्यापूर्वीच प्री-ऑर्डर म्हणून सिक्योरिटीच्या स्वरुपात पैसेही जमा केले होते. मात्र भारत सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने एलॉन मस्क यांना आपला प्रोजेक्ट बंद करावा लागला होता. तसेच भारतीय ग्राहकांचे पैसेही परत करावे लागले होते.