शेगाव (जि. बुलडाणा) : आषाढी वारीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांची पालखी शुक्रवार, २६ मे २०२३ रोजी संत नगरी शेगाव येथुन पंढरपूरकडे रवाना झाली.
श्री महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार असल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळीच मंदिरात मंगलवाद्य वाजविण्यास सुरुवात झाली. संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे पूजन झाल्यानंतर सन्मान व भक्तीपूर्वक पद्धतीने श्रींचा मुखवटा मंदिरातील पुरोहितांनी पालखीत आणून विराजमान केला. त्यानंतर टाळकरी, मृदुंगधारी वारकऱ्यांनी संत श्री गजानन महाराज आणि विठुनामाचा गजर केला.
पांढरेशुभ्र वस्त्र, गळ्यात तुळशीच्या माळा धारण केलेले साडेसातशे वारकरी या पायी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. याशिवाय डोक्यावर तुळशी वृंद्धावन घेतलेल्या दोनचेवर महिलाही शेगाव ते पंढरपूर पायी वारीत सहभागी झाल्या आहेत. शेगाव ते पंढरपूर हे पायदळ वारीचे यंदा ५४वे वर्ष आहे. कोरोनाच्या काळात पायदळ वारी निघाली नव्हती. यंदा मात्र पालखीतील वारकरी आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. ५५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी २६ जूनला पंढरपूरला पोहोचेल. त्यानंतर आषाढी उत्सवात येथील वारकरी सहभागी होणार आहेत.
अकोल्यात रविवारी आगमन
विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या शेगाव नगरी येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाली आहे. शेगाव येथुन निघाल्यानंतर गायगाव, भौरद मार्गे पालखी अकोल्यात रविवार, २८ मे २०२३ रोजी सकाळी ७ वाजता पोहोचणार आहे. भजन मंडळी, दिंडी, अश्व, हत्ती आणि ७५० वारकऱ्यांसह पालखीचे आगमन अकोल्यात होणार आहे. पालखीच्या मार्गावर असलेल्या गावांमध्ये उत्साह वाढला आहे. पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्री गजानन महाराज पालखी सत्कार समितीने स्वागताचे नियोजन केले आहे. त्यानुसार सर्व कार्यक्रम होणार आहेत. अकोल्यात पालखीचा मुक्काम दोन दिवस राहणार आहे.
गेल्या अनेक दशकांपासून शेगाव येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्यावतीने पालखीचे जंगी स्वागत व श्रींचे भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहे. डाबकी रोड मार्गे पालखी अकोला शहरात भ्रमण करते. एकाच वर्षी पालखीचा मार्ग बदलण्यात आला होता. त्यानुसार पालखी विठ्ठल मंदिर, अगरवेस, दगडीपूल मार्गे नेण्यात आली होती. त्यानंतर मात्र परंपरेनुसार पालखीचा नियमित मार्ग कायम आहे.
रविवार, ता. २८ मे रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट, जुने शहर येथून निघेल. पहिल्या दिवशी पालखी डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक, जय गुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी समोरून, लोखंडी पुलावरून, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, महानगरपालिका चौक, चांदेकर भवन चौक (ओपन थिएटर), निशांत टॉवर, चिवचिव बाजार प्रवेशद्वारातून, स्वावलंबी विद्यालय समोरून, मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पोहोचेल. येथे पालखीचा मुक्काम असेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून, उड्डाणपुला खालून, जिल्हाधिकारी निवास , वनविभाग कार्यालय समोरून, धर्मदाय आयुक्त कार्यालय समोरून खंडेलवाल भवनमार्गे गौरक्षण रोड, जुने इन्कम टॅक्स चौक, हॉटेल वैभव जवळुन आदर्श कॉलनी शाळा नंबर १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरण होईल. त्यानंतर संभाजीनगर श्री गजानन महाराज मंदिर, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प रोड, दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून, जिल्हा कारागृह समोरून, अशोक वाटिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगिच्या, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, लोखंडी पुलावरून, जय हिंद चौक, श्री राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठ मधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहतील. त्यानंतर मंगळवार, ३० मे रोजी पालखी वाडेगावमार्गे पुढच्या प्रवासाला निघेल.