नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा जिल्हा आदिवासीबहूल आहे. या जिल्ह्याचा मोठा परिसर जंगलव्याप्त आहे. हमखास व्याघ्र दर्शन घडवणारे ताडोबा याच जिल्ह्यात आहे. वीज निर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगांवर या जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालते. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाशी या जिल्ह्याला जोडण्याचा अंतिम टप्पा हिवाळी अधिवेशनात गाठला. जिल्हावासीयांना त्यांनी ही नवीन वर्षाची ही भेट दिली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर-राजुऱ्यापर्यंत करण्याची मागणी मंत्री मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ डिसेंबर रोजी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासीबहुल, वनव्याप्त जिल्हा असून ताडोबासारख्या राष्ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्यास येत असतात. हा जिल्हा विविध खनिजांनी समृध्द आहे. जिल्हयाची अर्थव्यवस्था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे राज्याच्या या भागातील वाहनांनादेखील समृध्दी महामार्गाद्वारे मुंबईकरिता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यासंदर्भात ६ जुलै २०२२ रोजी मंत्री मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार प्रस्तावसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला होता. २९ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमीटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजुऱ्यापर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व भूसंपादन करण्यासाठी अंदाजे २० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. तेव्हा मुनगंटीवार यांच्या विनंतीला मान्यता मिळालेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्यता देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
याबाबतच्या अहवालाला त्वरीत मान्यता देण्यात यावी व निधी उपलब्ध करण्याबाबतसुध्दा त्वरीत कार्यवाही करावी व पुढील कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ दिले. आता आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्हा लवकरच समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. ही चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर सांगितले.