Nagpur : राज्यात 11 हजार शिक्षकांच्या भरतीची यादी जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यानंतर शिक्षक भरतीसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या पदाची संख्या वाढत आहे. त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती करणे आवश्यक आहे. मात्र 5-6 वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात असल्यामुळे, अनेक शाळांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
10 हजार शिक्षकांच्या भरतीसाठी राज्यात जून महिन्यात टीईटी होणार आहे. शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना जारी केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य देण्यात येते. मात्र सीईटी परिक्षा पास होणाऱ्यांची संख्या 2 ते 3 टक्के असल्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तरी अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरतीसाठी मंजूर झालेली पदे रिक्तच राहतात. गेल्या वर्षीपासून शिक्षण खात्याने राज्यात 13500 शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.