New Delhi : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील 15 राज्यसभेच्या जागांसाठी मंगळवारी भक्कम मतदान झाले. मंगळवारी दुपारी चारवाजेपर्यंत मतदार पार पडले. सायंकाळी पाचपासून मतमोजणी सुरू झाली. रात्रीपर्यंत निकाल अपेक्षित आहे. 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागा रिक्त होत्या. त्यापैकी 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. डिसेंबरमध्ये तीन हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा निर्णायक विजय झाला होता. त्याचा परिणाम राज्यसभा निवडणुकीवर दिसला. बिहारमधील बदलती राजकीय समीकरणेही राज्यसभा निवडणुकीत मोलाची ठरली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ‘क्रॉस व्होटिंग’ झाले. त्यामुळे अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्हे आहेत.
समाजवादी पार्टीचा पाठिंबा
तीन राज्यांमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली. राज्यात 68 पैकी 67 आमदारांनी निवडणुकीत मतदान केले. यातील नऊ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. समाजवादी पार्टीच्या गटांमधील सात आमदारांनी पक्ष बदलत भाजपा उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. भाजपाला पाठिंबा देणारे बदायू येथील सपा आमदार आशुतोष मौर्य त्यांच्यापैकी एक आहेत. हंडिया येथील सपा आमदार हकीम चंद्र बिंद यांनीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला होता. सपाच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यात अभय सिंग, राकेश सिंग, राकेश पांडे, विनोद चतुर्वेदी, मनोज पांडे यांच्या नावांचा समावेश आहे. सपाच्या सात आमदारांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दर्शविल्याने समीकरण बदलणार आहे. राज्यसभेच्या 50 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.