Home » Rajendra Patani : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Rajendra Patani : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Karanja : वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0 comment

Washim : वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. राजेंद्र सुखानंद पाटणी हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले राजेंद्र पाटणी हे याआधी शिवसेनेकडून विधानपरिषद आणि विधानसभेत सदस्य होते. 1997 ते 2003 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले.

फडणवीसांचे विश्वासू

‘अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली, ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो’, असे देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

पाटणी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर ‘मोदी लाटेत’ त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाटणी हेच उमेदवार असतील, असे म्हटले जात होते. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटणी यांना 73 हजार 205 मते मिळाली होती. प्रकाश डहाके यांना 50 हजार 481 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी बसपाकडून मैदानात उतरलेले युसूफ पुंजानी यांनी 41 हजार 907 मते घेतली होती. राजेंद्र पाटणी सर्वात पहिल्यांदा 1997 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. 2004 मध्ये कारंजा मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 आणि 2019 मध्ये देखील त्यांनी कारंजा मतदारसंघातूनच निवडणूक जिंकली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

error: Content is protected !!