Home » मराठा आरक्षण : यवतमाळमध्ये तोडफोड, रास्ता रोको

मराठा आरक्षण : यवतमाळमध्ये तोडफोड, रास्ता रोको

by नवस्वराज
0 comment

यवतमाळ : जालन्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर या आंदोलनाने पुन्हा राज्यभरात पेट घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचे लोक आक्रमक होत आहेत. विदर्भातील यवतमाळमध्येही लोक आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले.

लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ शहर कडकडीत बंद केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वळवला. वनवासी मारोतीजवळ टायर जाळून नागपूर-तुळजापूर महामार्ग बंद केला. तब्बल दोन तास हा महामार्ग आंदोलकांनी बंद केला होता. दरम्यान सरकारचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी आंदोलकांनी जाळला. आंदोलन सुरू असताना यवतमाळातील हल्दीरामवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे होते. यवतमाळ येथे आज, मंगळवारी सकाळपासून मराठा-कुणबी मोर्चाने बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एका दुकानावर दगडफेक केली, तर विविध चौकांत टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.

शहरात सकाळी १० नंतर बंदची तीव्रता वाढली. आंदोलकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोस्टल ग्राउंड परिसरातील हल्दीरामच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली. या घटनेत दुकानाच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावला. यासोबतच शहरातील विविध चौकांत टायर पेटवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

शहरातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर वनवासी मारोती चौकात चक्काजाम आंदोलन करून टायर जाळण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेने शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यापारपेठ सध्या बंद आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. बंददरम्यान कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

error: Content is protected !!