अकोला : संवाद यात्रेच्या निमित्ताने अकोल्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. याशिवाय बावनकुळे यांच्या बैठकीच्या ठिकाणीही संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यात पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर राज्यातील मराठा समाज संतप्त झाला आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांचा रोष विशेषत: भाजपावर आहे. त्यामुळे अकोला दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बानवकुळे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. खामगाव ते अकोला असा प्रवास करीत असताना शेळद फाट्याजवळ मराठा समाजाचे कार्यकर्ते बावनकुळे यांच्या ताफ्यापुढे आडवे आलेत. देवानंद साबळे, गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड, विष्णू अरबट, ऋषीकेश साबळे, अंकित डिवरे यांनी हे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.