Home » सरकारच्या विरोधात अमरावतीमधील धनगर समाज संतप्त

सरकारच्या विरोधात अमरावतीमधील धनगर समाज संतप्त

by नवस्वराज
0 comment

अमरावती : राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम असतानाच आता राज्यातील धनगर समाजही संतप्त झाला आहे. अमरावतीत शनिवार, ९ सप्टेंबर रोजी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. यावेळी टायर जाळत राज्य शासनाचा निषेधही करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांचा मुख्य रोष होता तो राज्य सरकारचे मंत्री व भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना धनगर आरक्षण कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी या समितीने विखे पाटील यांना निवेदन दिले. त्यावेळी समितीमधील एका कार्यकर्त्याने विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला. मंत्री विखे पाटील यांनी यानंतर संयम दाखविला असला तरी तेथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व विखे पाटील यांच्या समर्थकांनी भंडारा उधळणाऱ्यांना शंकर बंगाळे यांना मारहाण केली.

धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याला झालेल्या या मारहाणीचे पडसाद शनिवारी अमरावती जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील धनगर समाजाने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील व राज्य सरकारच्या विरोधात चांगलीच घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून दिले. वातावरण अधिक बिघडू नये म्हणून अमरावती शहर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत घातली.

आंदोलनानंतर बोलताना धनगर नेते संतोष महात्मे म्हणाले की, धनगर समाजात भंडाऱ्याला महत्वाचे स्थान आहे. भंडारा पवित्र मानण्यात येतो. परंतु मारहाण करणाऱ्यांनी विखे पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांनी जणू काही एखादी आक्षेपार्ह वस्तु उधळली असे भासविले. त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे. धनगर समाज त्यांच्या हक्काचे आरक्षण मागत आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून विखे पाटील यांच्याकडे दाद मागण्यात आली. परंतु धनगरांचे प्रश्न सरकारला ऐकायचेच नसतील तर तसे सरकारने स्पष्ट करावे. त्यानंतर धनगर समाज आपला निर्णय घेण्यासाठी मोकळा होईल. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात धनगर समाज यापूर्वीही आक्रमक झाला होता. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला विरोध केल्याचा आरोप विखे यांच्यावर असल्याने हा संताप होता. अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतराची घोषणा झाल्यानंतर हा राग काहीसा कमी झाला होता. परंतु धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा राग पुन्हा उफाळुन आल्याचे बघायला मिळत आहे.

error: Content is protected !!