Home » भाजप, संघासोबतही राजकीय युती शक्य : अॅड. प्रकाश आंबेडकर

भाजप, संघासोबतही राजकीय युती शक्य : अॅड. प्रकाश आंबेडकर

by नवस्वराज
0 comment

मुंबई : भांडण लावणे हे भाजपचे कामच आहे. त्यामुळे आपला शत्रू कोण आहे हे नागरिकांनी ठरविले पाहिजे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमआयएमचे खासदार निवडून आल्यानंतर केलेल्या वाटाघाटी योग्य नसल्याने यापुढे त्यांच्याशी वाटाघाटी करण्यात येणार नाही, असे ते म्हणाले. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर हा मुद्दा सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असेल तर त्यांच्यासोबतही युती करायला तयार आहोत असे अॅड. आंबेडकर म्हणाले. भाजप आणि संघ काही आमचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याशीही राजकीय युती होऊ शकते असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये कोणताही एक नेता सुप्रीम बॉस नाही. त्यामुळे जितके पक्ष युतीत आहेत तितक्या पक्षाचे नेते त्या त्या पक्षापुरते सुप्रीम बॉस आहेत. आघाडी होते त्यावेळी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते असे अॅड. आंबेडकर यांनी ‘मविआ’चे बॉस शरद पवार असल्याच्या मुद्द्यावर म्हणाले. दरम्यान अॅड. आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर वारंवार टीका केल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना लक्ष्य केले होते. संजय राऊतांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सल्ला दिला तर तो आपण ऐकू असे नमूद करीत अॅड. आंबेडकर यांनी राऊत यांना आपली जागा दाखवून दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच भीमशक्ती-शिवशक्ती युतीची घोषणा केली होती. या आघाडीबाबत बोलताना भाजपचे अमरावती येथील राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी बुडत्याला काठीचा आधार असल्याची टीका केली आहे.

error: Content is protected !!