Home » दर्यापूर येथे जाळला आमदार राणांचा पुतळा

दर्यापूर येथे जाळला आमदार राणांचा पुतळा

by नवस्वराज
0 comment

अमरावती : बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेला राजकीय वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. या वादातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर प्राणघातक चाकु हल्ल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमदार राणा यांनी पोलिसांत केली आहे. आता राणांचा विरोध करण्यासाठी दर्यापूर येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

आमदार राणा यांनी ठाकरे यांच्या विरुद्ध अपशब्द वापरत पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रत्यारोप ठाकरे गटाने केला आहे. अशात राणा विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. अंजनगावसुर्जी पोलिसांनी याप्रकरणी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे ठाकरे गट संतप्त झाला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेस आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत आमदार राणा यांचा पुतळा पेटवून दिला. यावेळी आमदार राणा यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

आमदार राणा सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून कायद्याचा दुरूपयोग करीत असल्याची टीका आंदोलकांनी यावेळी केली. आमदार राणा यांच्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चाकुने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राणा समर्थक व हल्लेखोरांमध्ये हाणामारीही झाली. आमदार राणा यांनी विनाकारण उद्धव ठाकरे व आमदार वानखेडे यांच्यावर जहरी टीका केली. त्यामुळे काही कार्यकर्ते त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले असा प्रत्यारोप ठाकरे गटाने केला आहे. राणा विरुद्ध ठाकरे यांच्या या वादाचे पडसाद आता अमरावती जिल्ह्यात उमटत आहेत.

आमदार राणा यांचे राजकीय कारणांमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी वाद आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ, आमदार सुलभा खोडके, आमदार बच्चू कडू, आमदार अॅड. यशोमती ठाकूर ही त्यापैकी काही प्रमुख नावे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. तेव्हापासून राणा विरुद्ध ठाकरे गटातील वाद रंगत आहे. मात्र ठाकरे गटाशी असलेला राणांचा हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोप-प्रत्यारोपांपासून सुरू झालेला हा वाद आता हल्ले-प्रतिहल्ल्यापर्यंत पोहोचल्यामुळे भिती व्यक्त करण्यात येत  आहे.

error: Content is protected !!