यवतमाळ: महिला सक्षम झाल्या, स्वतंत्र झाल्या तरी, त्यांना पुरुषांची मदत लागतेच, हा समाजाचा गैरसमज खोडुन काढला आहे, यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलिस ठाण्याने. लोहारा गावातील पोलिस ठाण्यात शिपायापासून पोलिस निरीक्षकापर्यंत संपूर्ण अधिकारी, कर्मचारी महिलाच आहेत. या पोलिस ठाण्याचा आदर्श महाराष्ट्र पोलिस दलाने घ्यावा असाच आहे.
यवतमाळचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील वेगळ्या पद्धतीच्या ‘पोलिसिंग’साठी ओळखले जातात. यवतमाळ पोलिस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग राबविले, आजही राबवित असतात. अशात यवतमाळपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या लोहारा पोलिस ठाण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय घेतला.
लोहारा गावाची लोकसंख्या आता २५ हजारांच्या आसपास असेल. पोलिसांचे मूळ काय गुन्हेगारांना पकडणे, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे असते. पोलिस ठाण्यात पूर्णपणे महिलांचा ‘स्टाफ’ तैनात केल्यास एखाद्या कठीण प्रसंगी कसे करायचे अस प्रश्न हा निर्णय झाला तेव्हा अनेकांनी उपस्थितही केला. परंतु डॉ. पाटील यांनी महिलांवर विश्वास दाखवत ‘गो एहेड’चा संदेश दिला अन् झाले ना लोहारा संपूर्णपणे महिला कर्मचारी, अधिकारी असलेले पोलिस ठाणे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालायची असो की गुंडांवर वचक, वायरलेस सांभाळचे असो की हायवेवर अपघातप्रसंगी मदतीला जाताना वाहनाचे स्टेअरिंग अशा सर्वच आघाड्यांवर लोहारा पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी, कर्मचारी खरे उतरले आहेत. पोलिस ठाण्यात सध्या ६० जणांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाही महिला अधिकारी, कर्मचाऱ्याने कधी कर्तव्यात कसूर केलेला नाही किंवा त्यांच्या विरोधात कुणाची साधी तक्रारही नाही. उलट गावातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात लोहारा पोलिसांना अधिक यश आले आहे.