अकोला : अकोल्यातील राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष एवढ्या पराकोटीला गेले आहे की मनुष्याच्या जीवनाचे शेवटचे स्थळ असलेल्या स्मशानभूमिंची दुर्दशाही, धृतराष्ट्राची दृष्टी असलेल्या नेत्यांना दिसेनाशी झाली आहे.
मूलभूत सुविधांच्या बाबतीत अकोला महानगरातील जुने शहर कायम दुर्लक्षित आहे. विकासच नसल्याने या भागाचा विस्तार कासव गतीने होत आहे. लोकांचा ओढा सहाजीकच नवीन शहराकडे आहे.
महानगरात मोहता मिल मार्गावरील, कैलास टेकडी, उमरी व गडंकी येथे हिंदू स्मशानभूमी आहेत. मोहता मिल, कैलास टेकडी आणि उमरी येथे अंत्ययात्रेत आलेल्या लोकांना बसण्यासाठी पक्के आणि मोठे हॉल व शेड आहेत. त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात त्रास होत नाही. मोहता मिल आणि कैलास टेकडी येथे वृक्षारोपण करून छोटेखानी बगिचा तयार करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठीच्या जागेवरील शेड सुस्थितीत असून स्वच्छता चांगली आहे. लाकडाचा वापर कमी व्हावा म्हणून उमरी स्मशानभूमित दहनासाठी गोवऱ्यांचा वापर होणारी दाहिनी बसविण्यात आली आहे.
जुने शहरातील गडंकी स्मशानभूमी परिसरात पेव्हर्स बसविले आहेत. परंतु लोकांना बसण्यासाठी असलेला हॉल तसेच उभारलेले शेड व परिसर अस्वच्छ असून कचरा साचला आहे. अंत्यसंस्कारासाठीच्या जागेवरील शेडची परिस्थिती दयनीय आहे. काहीवर शेडच नाही.
जुने शहरात अतिमहत्वाच्या व्यक्ती रहात नाहीत. त्यामुळे दुर्लक्ष करण्यात येत असावे. लोकप्रतिनिधींनी दुरावस्थेकडे लक्ष देऊन सुधारणा करावी, अशी नागरीकांची मागणी आहे.